क्राईममहाराष्ट्र

मद्यधुंद मिहीरने शेजारून जाणाऱ्या कार चालकांनी थांबण्याच्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट

वरळी हिट अँड रन प्रकरण : वरळी हिट अँड रन प्रकरणात कावेरी नाखवा यांना फरफटत नेताना शेजारून जाणाऱ्या कार चालकांनी मिहीर शहाला थांबण्याचा इशारा दिला होता.  मद्यधुंद अवस्थेत निघालेल्या मिहीरने लक्ष दिले नसल्याचे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे.

वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला उडवल्यानंतर प्रदीप नाखवा एका बाजूला कोसळल्याचे दिसले. मात्र महिला गाडीच्या चाकात अडकल्याचे दिसले नसल्याचा दावा मिहीरने केला आहे. काही अंतरानंतर स्पीड ब्रेकर आल्याने गाडीत काहीतरी अडकल्याचे समजताच गाडी थांबवली. सीसीटीव्हीमध्ये ५:२५ ला अपघात झाल्यानंतर ५:३१ ला गाडी थांबल्याचेर दिसून येते. मिहीर आणि राजऋषी बिडावतने खाली उतरून बघितल्यावर महिला अडकल्याचे दिसताच तिला बाजूला काढून गाडी चालवण्यासाठी बिडावतच्या हाती दिली. त्या मार्गावर टर्न घेणे शक्य नसल्याने गाडी मागे घेत पुढे घेऊन कावेरी यांना चिरडत पुढे नेली.

जुहूच्या बारमध्ये मिहीर त्याचा मित्र ध्रुव देढीयाच्या ओळखीने गेला होता. ध्रुव नेहमी तेथे जाणारा असल्याने त्याच्या ओळखीने त्यांना बारमध्ये एंट्री दिली. मात्र बारमालकांनी कुठलेही ओळखपत्र न विचारता त्यांना दारू देत नियमांचे उल्लंघन केल्याची माहितीही समोर येत आहे.

गाडी वांद्रे-कलानगर येथे बंद पडल्यानंतर वडिलांना अपघाताची माहिती दिली. पुढे, वडील राजेश शहा यांनी बिडावतवर जबाबदारी घेण्यास सांगून तेथून पळून जाण्यास सांगितले. तेथून मिहीरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या प्रेयसीचे घर गाठले. तेथेच दोन तास झोप काढली. प्रेयसीच्या घरी जाईपर्यंत त्याचा मोबाइल सुरू होता. त्यानंतर त्याने मोबाइल बंद केल्याचेही पोलिसांना सांगितले. मिहीरचा सहभाग समोर आल्यानंतर पथक प्रेयसीच्या घरी पोहोचले; मात्र तो १५ मिनिटांपूर्वीच तेथून पसार झाला होता. पळून गेल्यानंतर मिहीरने वाटेत दाढी, मिशी, केस कापल्याचे पोलिसांना सांगितले. केस कापणाऱ्याची माहितीदेखील पोलिसांना दिली आहे. त्यानुसार, पोलिस संबंधितांची चौकशी करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button