
दिल्ली : अनेकदा सोनं, अंमली पदार्थ आणि परकीय चलनाची तस्करी विमानातून जगभरात होते. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विमान कंपन्यांचे कर्मचारीही तस्करीत गुंतल्याची प्रकरणंही समोर येत आहेत. गेल्या महिन्यातच एका भारतीय एअर होस्टेसला सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. आपल्या शेजारील देश पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) चे क्रू मेंबर्स तस्करीसाठी जगप्रसिद्ध आहेत आणि ते परदेशात गेल्यावर ‘गायब’ होतात.
आता पुन्हा एकदा PIA ची एअर होस्टेस परदेशी चलनाची तस्करी करताना पकडली गेली आहे. विशेष बाब म्हणजे या सुंदर एअर होस्टेसने तिच्या सॉक्समध्ये सुमारे 40 लाख रुपये किमतीचे डॉलर आणि सौदी रियाल लपवले होते. हे प्रकरण शनिवारचं आहे. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशी चलनाची तस्करी करताना या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आलं. एअर होस्टेसला कस्टम अधिकाऱ्यांनी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) आणि इमिग्रेशन यांच्या सहकार्याने पकडलं. आता या एअर होस्टेसचा यापूर्वीही तस्करीत सहभाग होता की नाही याचा तपास करण्यात एजन्सी व्यस्त आहेत. ही एअर होस्टेस लाहोरहून जेद्दाला जाणाऱ्या पीआयएच्या फ्लाइटमध्ये बसणार होती. अधिकाऱ्यांना तिची चाल काहीशी विचित्र वाटली. संशयाच्या आधारे विमानतळावर तिची झडती घेतली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. एअर होस्टेसच्या तपासणीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.