नीट पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान !
एनटीए आणि सीबीआयला अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

नवी दिल्ली प्रतिनिधी : यूजीसी- नीट पेपर लीक प्रकरणातील दाखल विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाचे सुनावणी पार पाडली असून यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले, पेपर लीक झाला हे सर्वांना माहिती आहे. मात्र, तो पेपर कशापद्धतीने लीक झाला, हे बघणंदेखील महत्त्वाचे आहे. तसेच जर पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून लीक झाला असेल तर आम्हाला ही परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश द्यावे लागतील. मात्र, केवळ दोन-तीन विद्यार्थ्यांनी काही चुकीचं कृत्य केलं असेल, तर त्यासाठी संपूर्ण परीक्षा रद्द करता येणार नाही. हा २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, अशी टीप्पणीही सरन्यायाधीशांनी केली.
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. नीट परीक्षेचा पेपर केव्हा लीक झाला? पेपल लीक झाल्याची तारीख अणि प्रत्यक्ष परीक्षा यांच्यात नेमका किती कालावधी होता? यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र पुढील सुनावणीपूर्वी सादर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. तसेच याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत काय कारवाई केली? याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, याप्रकरणाची पुढील सुनावणी आता गुरुवारी ११ जुलै रोजी होणार आहे. त्यापूर्वी एनटीए आणि सीबीआयने अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.