
पुणे प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाने निगडीतील साईनाथनगर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट सापडले होते. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तेव्हा पाच बांगलादेशी नागरिकांनी दलालांमार्फत बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा पिंपरी शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४२ नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पुण्यातील पासपोर्ट कार्यालयातून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचे उघडकीस आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४२ बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. पिंपरी पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाकडे पाठपुरावा करून ४२ जणांचे पासपोर्ट रद्द केले आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या दलालांचा शोध पोलीस करीत आहेत.